Home महाराष्ट्र एप्रिल फूलच्या नादात कोरोनाची थट्टा कराल तर खावी लागेल जेलची हवा!

एप्रिल फूलच्या नादात कोरोनाची थट्टा कराल तर खावी लागेल जेलची हवा!

0

दरवर्षीप्रमाणे जर यावर्षी सुद्धा तुम्ही इतरांना एप्रिल फूल करण्याची स्वप्न रंगवत असाल तर स्वतःला आवरा. याचं कारण असं की, जगभरासह भारतामध्ये देखील कोरोनाचे काळे ढग दाटून आले असून अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही अफवा पसरवल्या जाऊ नयेत यासाठी पोलीस प्रशासनाची सध्या समाज माध्यमांवर सक्त नजर आहे.

“१ एप्रिल २०२० रोजी एप्रिल फूल होऊ नका रस्त्यावर येऊ नका” असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी नागरिकांना केले आहे . कोरोना या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले असून कोरोना बाबत संभ्रमीत करणारे संदेश सोशल मीडियाद्वारे पसरवणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचेही शिरगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

१ एप्रिल निमित्त नागरिकांकडून वेगळ्या प्रकारचे मॅसेज एप्रिल फूल बनवण्याकरता टाकले जाण्याची दाट शक्यता आहे. “जमाबंदी उठलीआहे, सर्व लोक रस्त्यावर एकत्र यावे “अशा स्वरूपाचे मेसेज सोशल मीडियावर येण्याची शक्यता आहे. अशा एप्रिल फूल साठी सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजला कोणीही बळी पडू नये .अन्यथा लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊन प्रशासनाच्या तसेच लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.जर अशा स्वरूपाचे मेसेज लोकाकडून सोशल मीडियावर व्हारल झाल्यास व्हायरल करणाऱ्यावर त्याचबरोबर ग्रुप ॲडमिनवरही गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ग्रुप ॲडमिनने आपल्या ग्रुपमधील सर्व सदस्यांना पूर्ण सूचना द्याव्यात. तसेच सेटिंग मध्ये जाऊन फक्त ग्रुप ॲडमिन मेसेज सेंड करेल असे सेटिंग करावे. असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले आहे.