Home महाराष्ट्र राज्यात लवकरच पोलिसभर्ती, ८००० पदे भरणार: अनिल देशमुख

राज्यात लवकरच पोलिसभर्ती, ८००० पदे भरणार: अनिल देशमुख

0

राज्यामध्ये रखडलेली आठ हजार पोलिस पदांची भरती प्रक्रिया लवकरच घेतली जाईल, अशी भूमिका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज व्यक्त केली. कोरोनाच्या युद्धात मृत्यू पावलेल्या संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अधिकृत निवासस्थानी राहता येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

श्री. देशमुख हे आज सांगली दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आज जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.

देशमुख म्हणाले,”कोरोनाच्या युद्धात आपला जीव गमावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या घराची चिंता करू नये. सेवानिवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अधिकृत निवासस्थानी राहता येईल. सरकारने माणुसकीच्या नात्याने हा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या अनुषंगाने कर्तव्यावर असताना 58 जणांचा बळी गेला आहे, ही खेदाची बाब आहे. त्यासाठी शासन पातळीवरून 65 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच 55 वर्षावरील 12 हजार पोलिसांना पगारी सुटी देण्यात आली आहे. तसेच 50 ते 55 वर्षातील 23 हजार पोलिसांना ताणविरहित ड्युटी देण्यात आली. तसेच पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांची विशेष काळजी या काळात घेतण्यात आली आहे.”

कोरोनाविरूद्ध जिल्हा प्रशासन, महापालिका, आरोग्य कर्मचारी यांच्याबरोबरीने पोलीस अधिकारी व कर्मचारी आघाडीवर लढत आहेत. ही अभिमानाची बाब असून तीन महिन्यातील काम सर्वात उत्कृष्ट आहे. राज्यभरात कोरोनाने ५८ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या परिवाराला शासनाची मदत मिळावी म्हणून ५० लाखांचे सानुग्रह अनुदान, १० लाख पोलीस महासंचालक सहायता निधी आणि ज्या बँकेत त्यांचे खाते आहे त्या बँकेकडून काही रक्कम असे ६५ लाख रुपये देण्याचे नियोजन केले. जे कर्मचारी मृत्यू पावले त्यांच्या कुटुंबियांना कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीपर्यंत शासकीय निवासस्थानात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे,असे गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले.