Home महाराष्ट्र पुणे “माझ्या मुलीवर प्रेम करण्याची तुझी लायकी आहे का”, म्हणत पुण्यात घडला खरोखरचा...

“माझ्या मुलीवर प्रेम करण्याची तुझी लायकी आहे का”, म्हणत पुण्यात घडला खरोखरचा सैराट

0

पुण्यातील पिंपळे सौदागर येथे २० वर्षीय विराज जगताप चा धारधार हत्याराने खून करण्यात आला. आंतरजातीय प्रेमप्रकरणातून चार ते पाच लोकांनी सात तारखेला विराजवर जीवघेणे वार केले आणि जखमी अवस्थेत त्याचा मृत्यू झाला.

मृत विराजच्या काकांनी पोलिसांमध्ये ६ जणांविरुद्ध त्यांच्या पुतण्याच्या खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. या सहा जणांपैकी हेमंत कैलास काटे, सागर जगदीश काटे आणि अजून दोन अल्पवयीन तरुण यांना पोलिसांनी अटक केली असून अजून दोन आरोपींना पोलीस शोधत आहेत.

विराजच्या काकांनी दिलेल्या फिर्यादी नुसार, ” ते मृत विराजच्या आईसह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी विराज हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. विराजने मला सर्व हकिकत सांगितली. मुलीचे वडील, भाऊ यांनी टेम्पोने आपल्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.नंतर त्यांच्या हातातील दगड आणि लोखंडी रॉड पाहून घाबरून पळू लागल्याचे विराजने जितेश यांना सांगितले. धाप लागल्याने खाली पडल्यानंतर आरोपींनी लोखंडी रॉड आणि दगडाने आपल्याला मारहाण केली. माझ्या मुलीवर प्रेम करायची लायकी आहे का तुझी, असे म्हणून आपल्या अंगावर थुंकल्याचे विराजने सांगितले. दरम्यान, जखमी विराजला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
परंतु, सोमवारी दुपारी उपचारादरम्यान विराजचा मृत्यू झाला”.

आरोपींच्या फिर्यादीनुसार मृत विराज हा काटे परिवारातील एका मुलीच्या सतत मागे लागला होता तसेच त्याला अनेक वेळा समज देऊन सुद्धा त्याने त्यांचे ऐकले नाही, काटे आणि जगताप परिवारांमध्ये आधीपासूनच वैमनस्य असून विराजने दारू पिऊन धिंगाणा घातल्यामुळे त्याचे वादातून खुनात रूपांतर झाले.

दरम्यान सदर प्रकरणात महाराष्ट्र राज्याच्या अट्रोसिटी अगेंस्ट शेड्युल कास्ट आणि ट्राईब कायद्याअंतर्गत गुन्हा सांगवी पोलीस स्टेशन मध्ये नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस इन्स्पेक्टर अजय भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे.