Home आरोग्य राज्यात ३० एप्रिल ते १५ मे दरम्यान रुग्णसंख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता :...

राज्यात ३० एप्रिल ते १५ मे दरम्यान रुग्णसंख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता : राजेश टोपे

0

राज्यात ३० एप्रिल ते १५ मे दरम्यान राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये प्रचंड मोठी वाढ होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातली माहिती मीडियाला दिली आहे. राज्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली तरी राज्य सरकारची मोठ्या प्रमाणात तयारी झाली आहे, असेही राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील करोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर हा कमी करण्यासाठी शासकीय पातळीवर शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. येत्या ३० एप्रिल ते १५ मे दरम्यान स्पाईक येण्याची शक्‍यता आहे. पण त्यासाठी आरोग्य यंत्रणेची सगळी तयारी आहे. मात्र यासोबतच महाराष्ट्रातील जनतेने स्वयंशिस्त पाळायलाच पाहिजे, असेही राजेश टोपे यांनी आवाहन केले.

कोरोना उपचारासाठी असलेल्या रुग्णालयांमध्ये आता ऑक्‍सिजन स्टेशन उभारण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक खाटेजवळ ऑक्‍सिजन मास्क आणि त्याला ऑक्‍सिजनचा पुरवठा करणारी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्‍यकता वाटल्यास त्याचा वापर केला जाईल. मेडिकल ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी होऊ नये, म्हणून त्याच्या उत्पादकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रॉक्‍सिक्‍लोरोक्विनच्या गोळ्या देण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.