Home राष्ट्रीय मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट; सर्व लोकल स्थानकांवर हाय अलर्ट.

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट; सर्व लोकल स्थानकांवर हाय अलर्ट.

0

प्राईम नेटवर्क : आगामी तीन महिन्यांत मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर दहशतवादी हल्ल्याचा इशारा भारताच्या गुप्तचर संघटनांनी दिला आहे. त्यामुळे रेल्वेने सुरक्षा व्यवस्थेत वाढ करत अतिदक्षेचा इशारा दिला. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट असल्याने पोलिस यंत्रणा सतर्क आहे. सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यासह संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा,असे आदेश रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळाली आहेत.

मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. दहशतवादी हल्ल्याबाबत गुप्तचर संघटनेने माहिती दिल्यानंतर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बुधवारी सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे आदेश दिले आहेत. सुरक्षा व्यवस्थेत वाढ करा, संशयास्पद व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करा, रेल्वे स्थानकांवर विशेष करून लांबपल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेसमध्ये शोध मोहीम हाती घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यातच बुधवारी रात्री कर्जत ते आपटे मार्गावर धावणार्‍या बसमध्ये जिवंत बॉम्ब आढळून आला. कानपूर-भिवानी कालिंदी एक्स्प्रेस शौचालयातील दुर्घटना या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी केला आहे. गुप्तचर संघटनेच्या अहवालानुसार, येत्या तीन महिन्यांत मुंबई रेल्वे स्थानकांवर हल्ला होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे तीन महिन्यांसाठी मुंबईतील रेल्वे स्थानकांसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: दिल्लीकडून येणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमध्ये बॉम्बशोधक पथकाद्वारे आणि श्वान पथकाद्वारे तपासणी करण्याचे आदेश आहेत.